facebook

काळजी आणि आधार

एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांवरचे उपचार, त्यांची काळजी आणि त्यांना लागणारा आधार हे सर्व आजार कोणत्या टप्प्यावर आहे त्यावर अवलंबून आहे. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीला सुरवातीचा काही काळ कोणतीच लक्षणे दिसत नाही. हा काळ सहा ते आठ वर्षांचा असू शकतो. प्रतिकारशक्ती जसजशी कमी होईल तशी ही व्यक्ती तत्कालीन सर्वसाधारण आजारांना बळी पडते. या टप्प्यावर रुग्णाला वैद्यकीय उपचारांची तसेच मानसिक –सामाजिक आधाराची आवश्यकता असते. लाक्षणिक आजाराची तातडीने चिकित्सा आणि उपचार यामुळे एचआयव्हीसोबत जगणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यमान उंचावते आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने जगू शकतात.

 

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या (एनएसीपी) दुसऱ्या टप्प्यात सर्वसाधारण आजारांवर कमी खर्चात होणाऱ्या उपचार, काळजी आणि आधारावर भर देण्यात आला आहे. एनएसीपीच्या तिसऱ्या टप्प्यात  एआरटी उपचार सर्वांना उपलब्ध होतील, पोचतील आणि परवडतील यावर भर आहे. विशेषतः वंचित स्त्रिया आणि मुले यांना कौटुंबिक आणि सामाजिक आधाराद्वारे मानसिक स्वास्थ्य देण्यालाही महत्त्व दिले आहे. तसेच नेमून दिलेल्या एआरटीच्या मात्रेची योग्य सोय आणि या आजाराबरोबर येणारा कलंक हटवणे, भेदभाव थांबवणे हे अधोरेखित केले आहे.

 

या उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यक्रमाच्या काळात (२००७  ते २०१२) ३५० कम्युनिटी केअर सेंटर उभारण्याचे ठरवले आहे. सर्वाधिक बाधित आणि मध्यम बाधित जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीसोबत जगणाऱ्या लोकांच्या मदतीनेच ही सेंटर्स उभारण्याचा मानस आहे. जिल्ह्यातील एचआयव्हीबाधित लोकांची संख्या, साथीचे स्वरूप आणि नजीकच्या एआरटी केंद्राशी बांधिलकी यानुसार ही सेंटर्स उभारण्यात येतील. तेथे औषधांसंबंधी पथ्यपाणी, आवश्यक पोषकद्रव्ये यासंदर्भात समुपदेशन मिळेल. तसेच उपचारासंदर्भातील मदत, संदर्भ, पाठपुरावा, सामाजिक आधार आणि कायदेशीर सेवा पुरवण्यात येईल. राज्य एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण सोसायटीच्या माध्यमातून या कम्युनिटी केअर सेंटरपर्यंत पोचता येईल. त्यांच्या केंद्रांद्वारे किंवा सहकार्याने रुग्णांना कम्युनिटी केअर सेंटरची माहिती मिळेल आणि सेवा उपलब्ध होतील.

 

स्थानिक प्रतिसाद वाढवून नियमित औषधोपचार (९५ टक्के) आणि एआरटीचा प्रमाणित डोस वेळेवर घेणाऱ्यांची संख्या वाढवण्याचे एनएसीपीच्या तिसऱ्या टप्प्यात ठरले आहे. उपचार, काळजी आणि आधार याला महत्त्व देण्यात आले आहे. याद्वारे एचआयव्हीबाबत जनजागृतीदेखील होऊन देशातून एचआयव्ही – एड्सला हटवण्याचे आणि प्रसार थांबवण्याचे नॅकोचे उद्दीष्ट गाठणे सोयीचे होईल.

 

मुलांची काळजी आणि आधार

१५ वर्षांखालील सुमारे ५०,००० मुलांना दरवर्षी एचआव्हीची लागण होते. आतापर्यंत या मुलांना काळजी आणि आधाराला खूपच कमी प्रतिसाद होता. एनएसीपीच्या तिसऱ्या टप्प्यात यावर भर देण्याच्या उद्देशाने - एचआयव्ही बाधित मुलांचे जलद निदान आणि उपचार, आरोग्यसेवेच्या प्रत्येक पातळीवर बालरुग्ण विभागात एचआयव्हीबाधित मुलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, समुपदेशकांना एचआयव्हीबाधित मुलांच्या समुपदेशनासाठी खास प्रशिक्षण, एचआयव्ही बाधित मुलांना सामाजिक आधार मिळावा यासाठी सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमांशी जोडून घेणे, एआरटीच्या उपलब्धीसाठी, पाठपुराव्यासाठी आणि वाहतूकीसाठी मदत, मुलांचे पोषण, शिक्षण, मनोरंजन आणि कौशल्यविकासासाठी मदत, सामाजिक स्तरावर आणि संस्थापातळीवर मिळणाऱ्या उपचार,काळजी आणि संरक्षणाचे किमान निकष ठरवणे हे कार्यक्रम आखण्यात आले आहेत.